अभ्यास कसा करावा?

 

अभ्यास कसा  करावा ? 

अनेक विद्यार्थी असे असतात, ज्यांना अगदी मनापासून अभ्यास करायचा असतो. चांगले गुण मिळवायचे असतात, पण तरीही अभ्यास करायला बसले तरी त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. चित्त एकाग्र होत नाही. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे तर एकाग्र चित्ताने अभ्यास करणं आवश्यक आहे. पण हल्लीच्या वातावरणात मुलांचं लक्ष विचलित होईल, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आजुबाजूला असतात. मोबाईल, त्यातलं सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन गेम्स मित्र-मैत्रीणी, कुटुंबीय, आजूबाजूचा गोंगाट या नानाविध गोष्टी चित्त विचलित करण्याचं काम चोख बजावत असतात. हे सर्व अडथळे पार करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं काम मुलांना करायचं असतं.

१) अभ्यासासाठी योग्य जागा निवडा

अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट वातावरणाचीही आवश्यकता असते. म्हणून योग्य जागा निवडा. काही गोष्टी ध्यानात असू द्या. अभ्यासाला बसण्यासाठी अशी जागा निवडा जिथलं वातावरण शांत असेल. बसण्यासाठी टेबल-खुर्ची ठेवा. पुस्तके ठेवायला जागा असूद्या. त्या खोलीच्या बाहेर “Do Not Disturb” चा बोर्ड लावून टाका, जेणेकरून कुटुंबातले इतर लोक तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत.

२) अभ्यासाला तुमचं रुटीन बनवा 

अभ्यासाचं योग्य नियोजन करा. वेळापत्रक आखा. दिवसनिहाय प्रत्येक विषयाला ठराविक वेळ देऊन त्यानुसार नियोजनबद्ध अभ्यास करा. अभ्यासाला दैनंदिन कार्याचाच एक भाग बनवा. अभ्यास करण्यासाठी नेहमी उत्साही रहा. ४५ मिनिटांपेक्षा जास्त सलग अभ्यास करू नका. मध्ये ब्रेक घ्या. आपल्या आवडीनुसार ज्या वेळी तुमचं मन अभ्यासात एकाग्र होतं, ती वेळ अभ्यासासाठी निवडा.

३) चित्त विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा 

खूप वेळ अभ्यासाला बसायचं आहे, तर आधी चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करा. या गोष्टी तुमचा किती वेळ वाया घालवतील त्याचा नेम नाही. मोबाइल आणि अन्य गॅझेट दूर ठेवा. त्यामुळे तुमचा खूप सारा वेळ सत्कारणी लागतो.

४) योग्य पद्धतीने अभ्यास करा

जर तुम्हाला एखादा पाठ नीट समजून लक्षात ठेवायचा असेल तर तो नीट पद्धतीने वाचला पाहिजे. अभ्यास करताना समोर लहान लहान उद्दिष्ट ठेवा आणि ती पूर्ण झाल्यावर स्वत:लाच शाबासकी देण्यास अजिबात विसरू नका. नेहमी सकारात्मक विचार करा आणि रिकाम्या वेळी देखील चांगली प्रेरणादायी पुस्तके वाचा. जे वाचाल ते समजून उमजून वाचा.

५) स्वयंशिस्त गरजेची 

     दीर्घकाळ अभ्यास करण्यासाठी आवश्यक मूलमंत्रांपैकी एक आहे स्वयंशिस्त. अभ्यासात लक्ष लागायला हवंय तर स्वत:ला शिस्त असणं आवश्यक आहे. मन भरकटू लागलं की त्याला ताळ्यावर आणण्यासाठी आणि पुन्हा अभ्यासाकडे वळवण्यासाठी स्वयंशिस्त हवीच. कधीही तुमचं मन भरकटू लागलं की त्याला वेळीच आवर घाला आणि आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाकडे लक्ष द्या. मी अभ्यासावेळी अभ्यासच करीन असं हवं तर अभ्यासाला बसता तिथे समोर ठळक अक्षरात लिहून ठेवा. मात्र अभ्यासाकडे एक ओझं म्हणून नव्हे तर मजा म्हणून पाहा. हसतखेळत केलेला अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो.

६) आरामही महत्त्वाचा 

मध्ये ब्रेक न घेता सातत्याने अभ्यास केला तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. अभ्यासाचं ओझं वाटू शकत. म्हणूनच अभ्यास करताना दर ठराविक वेळेनंतर ब्रेक घेणं आवश्यक आहे. या ब्रेकच्या वेळी तुम्ही असं काही सकारात्मक काम करा, ज्यामुळे तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल. केलेला अभ्यास तुम्ही विसरणार नाही. दर ४५ ते ६० मिनिटांनंतर एक पाच-दहा मिनिटांचा ब्रेक अवश्य घ्या, जेणेकरून तुमचा मेंदूही फ्रेश राहील.

Comments

Post a Comment